सीजेपीला मोठा झटका! दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली, सीजेपीच्या १० हजार कार्यकर्त्यांची धरपकड

Foto
 नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी हे आंदोलन होणार आहे. सीजेपीने दिल्ली पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी मागितली होती, पण पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मागील आंदोलनात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
 
एसआयआरबद्दल उपस्थित झालेले प्रश्न, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल दोन निवडणूक आयुक्तांनी केलेल्या तक्रारीमुळे हा मुद्दा देशभरात तापला आहे. याविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई, बंगळुरूनंतर आता १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलन होणार आहे. पण, पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
 
कॉक्रोच जनता पार्टीला पोलिसांनी परवानगी का नाकारली?
सह पोलीस आयुक्त नुपूर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आंदोलनाच्या परवानगीचा अर्ज खूपच उशिर करण्यात आला. नियमानुसार अर्ज दहा दिवस आधी करणे अपेक्षित आहे. तशी माहिती पोलिसांना देणे गरजेचे असते. पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, कॉक्रोच जनता पार्टीला यापूर्वीही आंदोलनाची परवानगी दिली गेली होती. मागील वेळी झालेल्या आंदोलनात नियमांचे उल्लंघन केले गेले. आणि ज्या गोष्टींचे पालन केले जाईल असे सांगितले गेले, त्याही पाळल्या गेल्या नाहीत. आता नवी दिल्लीमध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल.
 
सीजेपी मुंबईचा पॅटर्न अवलंबणार?
कॉक्रोच जनता पार्टीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन करण्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांकडे परवानगी मागितली होती, पण परवानगी मिळाली नाही. परवानगी नसतानाही सीजेपीने शिवाजी पार्कवर आंदोलन केले होते. तशीच स्थिती आता दिल्लीतील आंदोलनापूर्वी उद्भवली आहे. आता परवानगी नसताना सीजेपी आंदोलन करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

आंदोलनापूर्वीच मोठा धक्का, सीजेपीच्या १० हजार कार्यकर्त्यांची धरपकड

दरम्यान आंदोलनाला जाणार्‍या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली असल्याचा दावा सीजेपीने केला आहे. सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनी एक्सवर पोस्ट करून हा दावा केला आहे. राजस्थान पोलिसांनी सीजेपीचे को-इंचार्ज दीपक बालियान यांना ताब्यात घेतलं आहे. त्याच्याशी दुर्व्यवहार करण्यात आला आहे. आमच्या कमीत कमी १० हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे, असं रांका यांनी म्हटलं आहे. तर देशात आणीबाणी लागू झाल्याचा दावा सौरव दास यांनी केला आहे.

सीजेपीने काल बंगळुरूमध्ये आंदोलन केलं होतं. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी संध्याकाळी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आल्याचा दावा केला आहे. मध्य प्रदेशात इटारसी जंक्शनवर डाव्या विचाराच्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची पहिली बातमी आली. हे विद्यार्थी जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी दिल्लीला जात होते. त्याशिवाय भोपाळ स्टेशनमध्येही तेलंगनातून येत असलेल्या काही सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. अभिजीत दीपके यांनी या सर्व घटनाक्रमाला आणीबाणी म्हटलं आहे.

दीपक बालियानला ताब्यात घेतलं
राजस्थानचे सीजेपीचे को- इंचार्ज दीपक बालियान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं आहे. भाजप एक डॉन पार्टी असल्यासारखी काम करत आहे. पण आम्हाला रोखू शकणार नाहीत, असं सौरव दास यांनी म्हटलं आहे. तर, दीपक बालियान यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या भावालाही मारहाण करण्यात आली, असं रांका यांनी म्हटलं आहे. राकां यांनी सर्व कार्यकर्त्यांना तातडीने अलवरला येण्याचं आवाहन केलं आहे.

पुण्यात धरपकड
अभिजीत दीपके यांनीही मोठा दावा केला आहे. पुण्यातून विद्यार्थ्यांचा एक ग्रुप १० ऑक्टोबरच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. रस्त्यातच त्यांना अडवून ताब्यात घेतलं आहे, असा दावा करतानाच देशात आणीबाणी लागल्याची घोषणा का करत नाही? असा सवालच दीपके यांनी केला आहे.